94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिक या पुण्यनगरीस यजमान पद मिळालेले असून आपल्या या भुमीत मायबोली मराठीचे साहित्य संमेलन भरते आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.हे संमेलन नाशिक येथे होण्यास आद्य साहित्यिक, कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या सर्वांचे एक वलय आहे. हे सर्वांना ज्ञात आहेच आहे.
त्यापैकीच 1 नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, इतिहासकार, उत्कृष्ट वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याबरोबरच अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, इतर पुस्तकांचे अनुवाद, इतिहास लेखन, भाषाशुद्धी सर्व क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या कार्यामुळेच 1938 साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांना देण्यात आले होते.
आज तर एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिक नगरीत मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये खालील उपक्रम राबवून आद्य साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा देखील जागर व्हावा व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा अशी समूहाच्या वतीने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी स्वरूपात यापूर्वी विनंती करण्यात आलेली होती.
मागण्या:
- साहित्य संमेलनाच्या ठिकाणास स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्यात यावे अथवा प्रवेशद्वारास किंवा व्यासपीठास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे.
- साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भव्यप्रतिमा अथवा मूर्ती ठेवण्यात यावी.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव साहित्य संमेलनात मांडण्यात यावा.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यावर आधारित विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे.
- सावरकरांचे साहित्य जनमानसात पोहोचावे यासाठी विशेष स्टॉलची उभारणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात यावी.
- सावरकरांची जन्मभूमी भगूर तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली नाशिक व भगूरमधील काही ठिकाणे तसेच त्यांची ग्रंथसंपदा व मराठी साहित्यातील त्यांचे योगदान याबाबतची एक ध्वनिचित्रफीत संमेलनात दाखविण्यात यावी.
नाशिक येथील संमेलनात वरील सर्व उपक्रम राबवून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान व्हावा व जनसामान्यांपर्यंत त्यांच्या साहित्यिक कार्याची देखील माहिती व्हावी अशी आम्ही विनंती केलेली होती.परंतु भगूरकरांचे व नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे लागेल की, या नगरीत साहित्य संमेलन पार पडत असतानाही वरील मागण्यांचा तसूभरही विचार केला गेला नाहीच नाही उलट नुकतेच साहित्य संमेलनावर आधारित एक गीत तयार करण्यात आले ते बघता त्यामध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख स्पष्टपणे करण्यास जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले दिसून येते. बाकी सर्व साहित्यिक व कलावंतांचा अगदी स्पष्टपणे व बिनदिक्कतपणे उल्लेख केलेला दिसून येतो. या पक्षपाती, संकुचित व दुराग्रही वृत्तीचा व संयोजकांचा आम्ही सर्व सावरकर प्रेमी आणि भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह तर्फे जाहीर निषेध करीत आहोत.