वय वर्ष बारा, डोक्यावर स्ट्रॉबेरीची जाळी, अख्ख नाशिक घालते पायाखाली!

नाशिक । गोकुळ पवार

वय वर्ष बारा. घरची आर्थिक परिस्थिती नाजुक, मोठ होऊन कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द. अन याच जिद्दीने पेटून उठलेली अश्वीनी. आई-वडिलांना हातभार लागावा म्हणून शाळेतून घरी आल्यानंतर डोक्यावर फळांची जाळी घेऊन अख्ख नाशिक खालच्या वर करत आहे. वाचा या मुलीच्या जिद्दीची कहाणी.

नाशिक शहरातील सातपूर भागातील अशोकनगर परिसरात अश्विनी आणि तिचे कुटुंब राहते. घरात आई वडील, मोठी बहीण आणि एक लहान भाऊ पाच जणांचं छोटास कुटुंब. मात्र लहानपणापासूनच अश्विनीच्या आईवडिलांनी मुलांवर बाराखडीचे योग्य संस्कार बिंबिवता बिंबिवता मायबापाला हातभार लावण्याचे शिक्षण दिले. अन यातूनच अश्विनी आगळे हि चिमुकली योग्य बोध घेत आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणासोबतच फळांचा व्यवसाय करायला शिकली.

अश्वीनी आगळे हि अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोयायटी येथील शाळेत सातवी इयत्तेत शिकते. अश्विनी शाळेत सकाळी सात वाजता ते जाते तर अकरा वाजता घरी येते. शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाला प्रामाणिकपणे आत्मसात करून अकराला शाळेची लांब गजर होताच अश्वीनी तडक घराची वाट धरते. त्यानंतर पाठीवर असलेलं दप्तराचे ओझं खुंटीला टांगून ठेवते. मात्र जेवते न जेवते तेच डोक्यावर फळांच्या जाळीचं ओझं घेऊन शहरात येते. मग ‘व दादा गॉड गॉड स्ट्राबेरी घ्या, ताजी ताजी स्टरबेरी घ्या’ अशी कर्णमधुर आरोळी देत शहरात फळ विकत फिरत असते. अशावेळी तिच्याकडे कधी चिक्कू, सफरचंदं, केळी तर कधी स्ट्राबेरी दिसून येते.

अश्विनीचे वडील गंवडी काम करतात तर आई देखील फळ विक्रीचा व्यवसाय करते. अश्विनी सांगते, ‘ माझे पप्पा सायंकाळी निमाणी तुन फळांच्या जाळ्या (कॅरेट) घेऊन येतात. मग मी अशोकनगर, सातपूर, शालिमार या परिसरात कधी रिक्षाने तर कधी पायी जात विकत असते. अनेकदा उन्हात डोकं दुखायला लागत. पण मम्मी पप्पा आठवले कि पुन्हा चालू पडते. साधारण मागच्या दिवाळीपासून हि फळ घेऊन अख्ख नाशिक पायाखाली घालते. हि एक जाळी सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी चार पर्यंत उरकते. मग तिथून पुन्हा घरी जाऊन शाळेचा अभ्यास अन आईला मदतही करत असल्याचे तिने सांगितले.

असं म्हटलं जात परिश्रमाशिवाय शिक्षण शक्य नाही, हाच विचार अश्विनीने मनोमन केला. तिथूनच तिच्या मेंदूवर फळ व्यवसायाचे विक्रीचे धडे आपसुकच कोरल्या गेले. या व्यवसायातून स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवून मायबापालाही सुखाचे दोन घास मिळावेत यासाठी हि चिमुरडी सतत धावपळ करीत असल्याचे दिसून येते. दिवसभरातून शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता आई-वडिलांचाही भाकरीचा प्रश्न सोडवत असल्याने सदर विद्यार्थीनी सगळ्यांचा कौतुकाचा विषय बनला आहे.

शिक्षण घेऊन आईवडिलांसाठी काहीतरी करायचं आहे. घर, गाडी, लहान भावांचे शिक्षण करायचे आहे. त्यामुळे हे करते आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना कोणत्याही प्रकारे हातभार लावायला पाहिजे. आपल्याला वाढविण्यासाठी, शिक्षणासाठी आईवडील मेहनत घेत असतात. मग आपणही त्यांना मदत केली पाहिजे. – अश्विनी शरद आगळे, सातपूर