शिवसेनेच्या दोन खासदारांसह ‘हे’ १२ खासदार निलंबीत

मुंबई । प्रतिनिधी

काँग्रेस खासदार छाया वर्मा, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि टीएमसीच्या डोला सेन यांच्यासह राज्यसभेतील बारा विरोधी सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उरलेल्या भागासाठी अधिवेशनात गोंधळ घातल्याने आणि गेल्या सत्रातील बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आले.

निलंबित सदस्यांमध्ये काँग्रेसचे सहा, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी एक सदस्य आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी सदस्यांनी तीन शेती विधेयकांना विरोध करत असताना सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या सहा सदस्यांची नावे आहेत – फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन आणि अखिलेश प्रसाद सिंग, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई, टीएमसीच्या डोला सेन आणि शांता छेत्री, सीपीएमचे एलामाराम करीम आणि सीपीआयचे बिनॉय विश्वम हे उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहेत.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सदस्यांच्या निलंबनाची घोषणा करत सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब केले. निलंबनाची कारवाई झालेल्या या १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदारांवरील कारवाईनंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.