‘काळी टोपी, काळी नीती’, नाशिकमध्ये शिवसेनेचे राज्यपालांना जोडे मारो आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज नाशिकमध्ये शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले..

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात याचे पडसाद आता उमटायला लागले आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे तर या वक्तव्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. तर राज्यपाल यांच्या पोस्टरला यावेळी जोडे देखील मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते, तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता.

यावेळी राज्यपाल ‘चले जाव’च्या घोषणा देऊन राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी देखील शिवसेनेने केली. राज्यपालांनी माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे..