शेर शिवराज है! शिवजयंतीनिमित्त नाशिक शहर सजलं!

नाशिक । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज संपूर्ण नाशिक शहर सजलं आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौक स्वागत कमानींवर भगवे झेंडे झळकले आहेत. नाशिकरोड, देवळालीगाव, विहितगाव, जेलरोड, पंचवटी, सिडको, सातपूर परिसर भगवेमय झाले असून, शहरात शिवजयंतीनिमित्त अत्यंत उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे.

राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे नाशिकमधील शिवप्रेमींमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांचा गजरात, गुलालाची उधळण करत नाशिक शहरातील चौकाचौकात शिवजयंतीनिमित्त मिरवणूका काढण्यात येणार असून संपूर्ण नाशिक शहर नाशिक ढोलच्या आवाजाने दुमदुमून गेलं आहे.

शिवप्रेमींचा हाच उत्साह उधाण गेल्‍या काही दिवसांपासून शहरात दिसून येत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंती उत्‍सवाची तयारी सुरू होती. वाहनांवर भगवा झेंडा बांधत वातावरण निर्मिती झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठा देखील सज्ज झाल्या होत्या.

दरम्यान आज शहरभरात ठिकठिकाणी शिवरायांचे मोठमोठे देखावे उभारण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व उत्साहाचं वातावरण पाहता नाशिककर शिवजयंतीसाठी सज्ज असून अवघे नाशिक शहर भगव्या झेंड्यांनी आणि शिवछत्रपतींच्या जयघोषात शिवमय झालं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.