Home » जेव्हा शिवाजी महाराज वणी-दिंडोरीतील लढाईत उतरले होते..!

जेव्हा शिवाजी महाराज वणी-दिंडोरीतील लढाईत उतरले होते..!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
शिवरायांचा इतिहास अभेद्य आहे. एवढ्या मोठ्या इतिहासात राजांनी वणी दिंडोरीच्या लढाईत सहभाग घेऊन मुघलांना पळवून लावले होते, हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे नाशिक दौऱ्यावर होते. ते यावेळी त्र्यंबकजवळील महिरावणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सुरत लुटीनंतर महाराजांच्या वणी दिंडोरी लढाईची घटना नागरिकांनी सांगितली. शिवरायांच्या कारकिर्दीत वणी लढाई महत्वाची होती. त्यांनी स्वतः या लढाईत सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अशी झाली वणी दिंडोरीची लढाई
पुरंदरचा तह मोडल्यानंतर महाराजांनी मुघलांवर हल्ले करायला सुरुवात केली. भराभर एकेक प्रांत , किल्ले घेण्यास महाराजांनी प्रारंभ केला. महाराजांनी पुन्हा एकदा सुरतवर हल्ला करुन सूरत लुटायचे ठरविले.आणि भली मोठी संपत्ती महाराजांना या हल्ल्यात मिळाली.

सूरतवर हल्ला केल्याचे शहजादा मुअज्जमला समजले. त्याने दाऊदखान कुरैशी याला महाराजांवर हल्ला करण्याचा हुकुम दिला. तो त्वरेने फौज घेऊन महाराजांच्या पाठलागावर निघाला. महाराज तोपर्यंत बागलाणपर्यंत आले होते. आपल्या पाठलागावर दाऊदखान कुरैशी फौजेसह येत आहे ही खबर महाराजांना मिळाली. महाराजांनी मग वणी – दिंडोरीच्या मार्गाने पुढे जाण्याचे ठरविले.

महाराजांच्या फौजेची हालचाल दाऊदखानास मिळाली. त्यानुसार दाऊदखान लगेच चांदवडकडे निघाला. महाराजांना चांदवडचा डोंगर ओलांडूनच दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे दाऊदखान चांदवडास रात्रीच्या सुमारास येऊन पोहोचला. मध्यरात्रीच्या सुमारास दाऊदखानास खबर मिळाली की , महाराज कंचन – मंचनचा घाटामार्गे गुल्शनाबाद म्हणजे नाशिकच्या रस्त्याने जात आहेत. कंचन – मंचनच्या घाटापासुन चांदवड सुमारे पाच कोस लांब होते. दाऊदखानाने लगेच आपल्या फौजेला कूच करण्याचा आदेश दिला. त्याने इख्लासखानास त्वरेने पुढे पाठविले.

महाराज स्वत: अंगात बख्तर घुगी घालून दोन्ही हातात पट्टे चढवुन युध्दास सज्ज झाले. महाराजांच्या निसबतिस सरनौबत प्रतापराव गुजर , व्यंकोजीपंत , आनंदराव असे मातब्बर सरदार होते. इख्लासखान हा तडफदार सरदार होता. त्याने त्वेषाने मराठ्यांवर हल्ला चढविला. घनघोर लढाईस सुरुवात झाली.

१६७० ला झालेले हे युद्ध संपूर्ण दिवसभर चालले. शेवटी दाऊदखानास माघार घ्यावी लागली. या युद्धात जवळपास तीन हजार मुघल ठार झाले. अशी हि वणी दिंडोरीची लढाई.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!