‘शेत तयार, रोपे तयार; मात्र मजूर मिळेना!

नाशिक । प्रतिनिधी

यंदा अवकाळी पावसामुळे रब्बी पेरण्या लांबल्या, त्याचबरोबर कांदा लागवड देखील उशिराने सुरवात झाली. मात्र कांदा लागवडी एकत्रित आल्याने मजुरांची वाणवा निर्माण झाली. परिणामी मजुरांकडून मनमानी दराने बोली लावली जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यामुळे कांदा लागवडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर तालुक्यांत उन्हाळ कांदा लागवडीला वेग आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मजुरांअभावी कोंडीत सापडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उन्हाळा कांदा लागवड एकत्रित आल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक मजुरांना इतर गावात अधिक दराने मजुरी मिळत असल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे.

अशावेळी संबंधित शेतकऱ्यांना मजुरांना मजुरीसह चहापाणी, वाहनभाडे यासह मनमानी दर देऊन कांदा लागवड करावी लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांमुळे यंदाची कांदा लागवड लागवड चांगलीच महाग पडत असल्याचे दिसत आहे. एकीकडे सर्वांचीच कांदा लागवड सुरु असताना मजूर मात्र ज्याच्याकडे दहा वीस रुपये मिळतील अशा शेतकऱ्याकडे जात आहेत. यामुळे इतर शेतकऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असून दुसरीकडे मजुरांअभावी कांदा रोपे खराब होत चालल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

एकूणच ‘शेत तयार, रोपे तयार; मात्र मजूर मिळेना’ अशी स्थिती सध्या जिल्ह्यात झाली आहे. कांदा लागवडी एकदाच आल्याने मजूरटंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी तर रात्रीच्या वेळी कांदा लागवड होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उन्हाळ कांदा लागवड एक युद्धच’’असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी मजुरीचा रेट नऊ ते दहा हजार होता, आता तो अकरा ते बारा हजारांवर पोहचला आहे. त्यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. मजुरांच्या मनमानी कारभारामुळे रोपे लागवडीसाठी लेट होत आहेत. मजुरांकडून मनमानी दराची बोली लागल्याने मजुरी खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. – सुदाम रघुनाथ हळदे, शेतकरी, आडगाव