मखमलाबाद रोड परिसरातील कालव्यात बुडून तीन जणांचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या मखमलाबाद रोड परिसरात असलेल्या समर्थ नगर येथून वाहणाऱ्या कालव्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या तिन्ही जणांना पाण्याच्या खोलीचा व गाळाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात बुडून त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली.

निलेश काशिनाथ मुळे (१४), प्रमोद बबन जाधव (१३) सिद्धेश रामदास धोत्रे (१३) अशी मयत मुलांची नावे असून (सर्व राहणार अश्वमेध नगर, आरटीओ ऑफिस जवळ) आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ नगर परिसरातील तीन मित्र पोहण्याच्या निमित्ताने कालव्यात उतरली होते. यावेळी खोलीचा तसेच गाळाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. सदर घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. काही वेळानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोधकार्य सुरु करत केले. कालव्यात पाणी सोडल्याने पाण्याच वेग जोरात होता. यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. मात्र काही वेळाने तिघांनाही शोधण्यात जवानांना यश आले. यावेळी तिघांचीही प्रकृती गंभीर होती. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारदरम्यान या तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.