संमेलनस्थळी सात हजार अतिथींसाठी भव्य मंडप, १२ LED स्क्रिन तर ५ प्रवेशद्वार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन केवळ साहित्य संमेलन न राहता तो नाशिकचा उत्सव व्हावा, यासाठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संमेलनाची शक्यता धूसर झाली होती. मात्र आता हा अडथळा दूर होऊन गोदा काठावर डिसेंबरच्या गुलाबी थंडीत नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा भरणार आहे. बालसाहित्य, कवीकट्टा, कथाकथन, ग्रंथ दिंडी, असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात आहेत. सध्या या संमेलनाच्या तयारीला वेळ आला असून भुजबळ नॉलेज सिटीमध्ये जणू उत्सवाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भव्य असा सभा मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्या बारीक सारीक गोष्टींवर पालकमंत्र्यांची नजर असणार आहे. या साहित्य संमेलनासाठी अनेक साहित्यिक, कलाकार, लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सह अनेक नामांकित अतिथी येणार आहे. त्यामुळे या सर्वांच्या देखरेखी साठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

संमेलनस्थळी बालकवी संमेलन, कवी कट्टा, गझल आणि भव्य पुस्तक प्रदर्शन अशी वेगवेगळी व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये असणार आहे. तर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहराचं सुशोभीकरण, चौकाचौकात तसेच गंगाघाटावर आकर्षक सजावट, रांगोळ्या, लाईटिंग, संमेलनाचे होर्डिंग्ज लावण्याचं नियोजन करण्यात येतं आहे.

अशी आहे व्यवस्था
संमेलनस्थळी ०७ हजार जण बसतील इतक्या आसन क्षमतेचा जर्मन स्ट्रक्चर असलेला सभामंडप बांधण्यात येत आहे…विशेष म्हणजे ६० मीटर रुंद तर २५० मीटर लांब असलेल्या या सभा मंडपात १२ LED स्क्रिन तर ५ प्रवेशद्वार असणार आहे. इतकंच नाही तर 80×45 साईजचा ३ स्टेप असलेला स्टेज बांधण्यात येत आहे.