एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला, नाशिकमध्ये अर्धनग्न आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विलिनीकरणाची मागणी घेऊन शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला. नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत राज्य शासनाचा निषेध केला.

एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार निगेटिव अहवाल तयार करत असल्याचा आरोप करीत काल नाशिकमध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर असून विलिनीकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशान्वये शासनाची त्रिसदस्यीय समिती कामकाज करत आहे. मात्र न्यायालयापुढे हा अहवाल येण्यापूर्वीच तो निगेटिव तयार करण्यात आले असल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दरम्यान त्रिसदस्यीय समितीने अद्याप अहवाल दिलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढते आहे. शिवाय अहवालाचे कामकाज सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार विधिमंडळात विलीनीकरण अशक्य असं विधान केले होते. त्यामुळे देखील कर्मचाऱ्यांमध्ये खदखद आहे. समितीवर प्रत्यक्ष दबाव असल्याने अहवालात बदल होऊ शकतो, अशी शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमधील क्रमांक एकच्या आगारात हे आंदोलन झाले. यावेळी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. विलिनीकरणाच्या मागणीच्या प्रश्नावर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आझाद मैदान येथे एसटी कर्मचारी संपावर बसले आहेत. या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक येथे आंदोलन करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.