मद्यपी तरुण चढला पिंपळाच्या झाडावर अन पुढे झाले काय?

नाशिक । प्रतिनिधी

बोहार पट्टीतील सरकारवाडा वास्तुच्या पाठीमागे असलेल्या पिंपळाच्या मोठ्या झाडावर एक मद्यपी युवक सोमवार (दि.०७) रोजी रात्री साडे दहा वाजेपासून चढून बसला होता. त्यास खाली उतरवताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांची चांगलीच दमछाक झाली. नंतर युवकानेच थेट पिंपळाच्या झाडावरून उडी घेतली.

नाशिकच्या सराफ बाजारात लागून असलेल्या बोहर पट्टीमध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस चौकी आहे. या पोलीस चौकीला लागून पिंपळाच्या मोठे झाड असून या झाडावर रात्रीच्या अंधारात हा मध्ये मद्यपी युवक चढला होता. या झाडाच्या शेंड्यावर महावितरणच्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या जात असल्याने अनेकांनी त्यास खाली येण्यास सांगितले.

मात्र युवकाने कुणाचेही न ऐकता झाडावरच बसून राहिला. यावेळी नागरिकांनी हि बाब पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी देखील त्या युवकास खाली येण्यास सांगितले, मात्र त्यांने कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. यावेळी बघ्यांची गर्दी जमली. पोलिसांनी गस्ती वाहनाद्वारे ध्वनीक्षेपकातून पुन्हा खालीं येण्यास सांगितले. मात्र तो युवक काही खाली येईना.

अखेर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करीत पंचवटी उपकेंद्राचा बंब जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एवढा सर्व लवाजमा बघून युवक घाबरला. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या खोडाभोवती सीडी लावली आणि त्या युवकास उतरण्यास सांगितले. मात्र युवकांने यावेळी देखील खाली येण्यास नकार दिला. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांची दमछाक झाली. अखेर या युवकाने स्वतःहून थेट झाडावरून उडी घेत खाली आला. मात्र यामध्ये तो जखमी झाल्याने त्यास पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.