जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी घेतला बूस्टर डोस

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात बूस्टर डोसचा श्रीगणेशा झाला असूनजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिसऱ्या लसीचा लाभ घेत पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचेआवाहन यावेळी करण्यात आले आहे.

देशभरात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यास सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही बूस्टर डोस ला शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात डॉ. श्रीवास यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिप मुख्याधिकारी लीना बनसोड, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लसीचा तिसरा डोस घेतला आहे. तसेच शहरातील १३८ केंद्रावरही हा डोस देण्यास सुरवात झाली आहे.

नाशिक मनपा प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली असून शहरातील १३८ केंद्रावर हा बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच बूस्टर डोस दिला जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तुम्हाला बूस्टर डोसही कोविशील्ड लसीचा घ्यावा लागेल.

विशेष म्हणजे या बूस्टर डोस साठी पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागण्याची गरज नाही. यामध्ये दोन पर्याय असून सुरुवातीला ते कोविन अँप वर जाऊन वेळ घेऊ शकतात. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जात लसीकरण करुन घेऊ शकता.

सदर बुस्टर डोस साठी लसीचा दुसरा डोस ९ महिन्यापूर्वी घेतला असणे आवश्यक आहे. तर तिसऱ्या डोससाठी नोंदणी करु शकता. जर दुसरा डोस घेऊन ९ महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागणार आहे.