अहो आश्चर्यम! चोराचा प्रामाणिकपणा असाही!

नाशिक | प्रतिनिधी
सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांनी नाशिककर हैराण आहेत. मात्र शहरात चोराच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. ते ऐकून तुम्हालाही चोराची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही.

अशीच एक घटना जेलरोड परिसरात घडली आहे. येथील चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने परत केले आहेत. एवढेच नाही तर दागिने परत करताना या चोराने चिठ्ठीद्वारे चक्क माफीनामा लिहून पाठवला आहे.

ही तोंडात बोट घालायला लावणारी घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जेलरोड परिसरात शरद साळवे राहतात. शनिवारी यांच्या घरातून तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यांनी याबाबत चोरी झाल्याची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या चोरीचा तपासही सुरू केला होता.

दरम्यान घटनास्थळी पोलीस शोध घेत असताना साळवे यांच्या घराच्या छतावर चोरीला गेलेली दागिन्यांची बॅग आणि त्यासोबत एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत चोराने ‘सॉरी सर मला माफ करा’अस लिहून चोरी केल्याबद्दल माफी मागितली आहे.