मुस्लिमबहुल परिसरात कडकडीत बंद

मुस्लिम समाजाचे धर्मगुरू पैगंबरांविषयी अपमानास्पद घोषणाबाजी व त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ आज बंदची हाक देण्यात आली आहे.त्याला प्रतिसाद देत नाशकातील मुस्लिमबहुल परिसरात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद असल्याचे दिसून येत आहे. शहरात कुठे ही कोणत्या प्रकारचे निदर्शने न करता जुम्माच्या नमाजानंतर मशिदींमध्ये देशात व त्रिपुरा येथे ‘अमन’साठी खास दुआ पठण केली जाणार आहे.

त्रिपुरा येथे पैगंबरांबद्दल अपशब्द वापरुन काही समाजकंटकांकडून तेथील स्थानिक मुस्लीम बांधवांवर अन्याय अत्याचार केले जात आहे.स्थानिक मुस्लीम बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्रिपुरा येथील हलगर्जीपणामुळे स्थानिक मुस्लीम बांधवांवर अत्याचार झाल्याचा आरोप नाशिक मधील मुस्लिम बांधव करत आहेत.

मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे, त्यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे. हिंसेच्या आड ज्या समाजकंटकांकडून रक्ताची होळी खेळली जात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करावे. अशा मागण्यासह घटनेच्या निषेधार्थ हे बंद पुकारण्यात आले आहे.