रामशेजवरील दारूगोळा कोठार शोधण्यात यश

नाशिक । प्रतिनिधी

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची १४७ वी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम अजिंक्य दुर्ग रामशेजवर झाली. या दोन दिवशीय मुक्कामी मोहिमेत किल्ले राममशेजवरील अस्ताव्यस्त पडलेल्या दगडांत, झुडपात, गवतात लुप्त झालेले शस्रगार, दारुगोळा कोठार अथक श्रमदानातून मुक्त करण्यात आले. किल्ल्यावरील हा ऐतिहाशिक ठेवा पुन्हा यामुळे दुर्गप्रेमींना अभ्यासता येणार आहे.

नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षे रामशेजच्या अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमा सुरू आहेत. किल्ल्यावरील बहुतांशी अज्ञात वास्तू जमिनीत लुप्त झालेल्या आहेत तर काही केवळ तग धरून भग्न स्थितीत आहे. किल्ल्यावर राज्यभरातून अनेक दुर्गप्रेमीं, पर्यटक रामशेजवर येतात. यांना या लुप्त वास्तूं बघता याव्यात, त्यांचा इतिहास जानता यावा यासाठी शिवकार्य गडकोटच्या वतीने किल्ल्यावर श्रमदानातून इतिहासाची साक्ष देणारा चुन्याचा घाणा, सैनिकांचे जोते, सरदारवाडा, शस्रगार, दारुगोळा कोठार, किल्ल्यावरील १८ पाण्याचे जुने टाके यांना प्रकाशात आणले.

तसेच श्रमातून किल्ला प्लॅस्टिकमुक्त ठेवला. किल्ल्याच्या माथ्यावर चाफ्याची झाडे लावून जगवली जात आहे. अखंडित पर्यटकांना दुर्गजागृती व दुर्ग कसा बघावा. त्याचा इतिहास सांगितलं जातो. किल्ला वनवामुक्त राहावा या दृष्टीने प्रयत्न केले जातात. याच कार्याचा प्रवास म्हणून दोन दिवसाच्या मोहिमा सातत्याने सुरू आहेत. दरवर्षी किल्ल्यावर ऐतिहासिक जोत्यांवर वास्तूंवर वाढणारे झुडपे काढून त्या वास्तू स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे. या मोहिमेत शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ, श्रमदान समितीचे प्रमुख भूषण औटे, रोहित गटकळ, अमोल बच्छाव, किरण दांडगे, सोमनाथ जाधव, रोहित भामरे, प्रतीक सावंत, सलीम सय्यद उपस्थित होते

दुर्ग रामशेजवर खूप मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक आहे. याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्षच आहे. वनदुर्ग असलेला किल्ला त्यावर प्लास्टिक बाटल्या व प्लॅस्टिक पिशव्या, कुरकुरे पाकीट मोठ्या प्रमाणात किल्ल्याच्या माथ्यावर व किल्ल्याच्या गवतात, पायथ्याशी आढळते. दुर्गसंवर्धक व काही जाणकार दुर्गप्रेमीं हे प्लास्टिक वाचतात. मात्र यावर स्थानिक व्यावसायिक व वनविभाग, गावाने बंधने आणावी. किल्ला प्लास्टिक पासून वाचवावा अशी मागणी यावेळी किल्ल्यावरील बैठकीत करण्यात आली. याबाबत वनविभागास पत्र ही दिले जाणार आहे.