मुंबई नाका पोलिसांच्या हातावर तुरी, संशयित आरोपी फरार

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई नाका पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका संशयित आरोपीने तोंड धुण्याचा बहाणा करत पलायन केले आहे. अमोल उर्फ बंटी साळुंखे असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातुन दोन संशयित आरोपीना आणले होते. यातील साळूंखे याने तोंड धुवायला जायचे असल्याचे पोलिसांना सांगितले, पोलिसांनी सोडताच त्याने पलायन केले. मुंबई नाका पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या द्वारका पोलीस चौकीतील हा प्रकार असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेनंतर मुंबई नाका पोलिसांनी तपास सुरु केला असून सोबत असलेल्या संशयित आरोपीची चौकशी केली जात आहे. अमोल यास चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. एका गुन्ह्यांच्या तपासासाठी आणले असता त्याने पलायन केल्याने पोलिसांची भंबेरी उडाली आहे.

एकीकडे नाशिक शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना आज बुधवारी मुंबई नाका पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक संशयित आरोपी तुरूंगातून पसार झाला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.