शाळांना पुन्हा कुलूप लागणार; शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या..!

नाशिक । प्रतिनिधी
राज्यात ओमायक्रोन संसर्ग असाच वाढत राहिल्यास सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात येतील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होणार कि काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनामुळं गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच काही भागात सुरु केल्या गेल्या. मात्र ओमिक्रॉनच्या संकटामुळं आता एक डिसेंबरपासून सुरु झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई महापालिका प्रशासनाने पुन्हा शाळा बंद होण्यासंदर्भात संकेत दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात ओमायक्रोन चे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी शाळा सुरु करण्यात आल्याने सध्या विद्यार्थी शाळेत रममाण झाले आहेत. मात्र अलीकडे ओमायक्रोनची भीती वाढत असल्याने पुन्हा शाळा बंद करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड म्हणाल्या कि ओमायक्रोन चे रुग्ण वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मात्र सध्यातरी राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच आढावा घेऊन शाळांबाबत चार ते पाच दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरु व्हावे अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.