“इथे” उभारणार सावित्रीबाईंचा सर्वात मोठा पुतळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा. येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची आज पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.

एन.एस.उमराणी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल.

विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घेण्यात याव्या त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.मंत्री भुजबळ यांनी प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.