निसर्गाचा हाहाकार ! शेतकऱ्यांचं हाता तोंडाशी आलेलं पीक जाणार..

परतीच्या पावसाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची धावपळ केल्यानंतर बेमोसमी व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात आज पुन्हा पावसाने हाहाकार घातला. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर गेला आठवडाभर ढगाळ वातावरण होते. आज दुपारी 3 वाजेनंतर रिमझिम पाऊस पडत असतांना भात पिकाचे धान शेतात घरी सुरक्षित ठिकाणी नेताना प्रचंड धावपळ झाली. आज सायंकाळी 6 वाजेनंतर साधारण तासभर कोसळधार झाल्याने पिकाची खाचरे पूर्णपणे भरली.

शेतात कापणी करून ठेवलेल्या कडप्या तरंगताना दिसत होत्या. महसूल प्रशासन आणि विमा कंपन्यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी आर्त विनवणी शेतकऱ्यांनी केली आहे. आजच्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील शेकडो भात उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

मजुरीअभावी यंत्राने काम करण्याची आशा देखील मावळली

वाढती मजुरी त्यातच मजुटांच्या टंचाईला कंटाळून भात कापणी यंत्र व हार्वेस्टरच्या मदतीने भाताची सोंगणी करण्याची आशा बेमोसमी पावसाने मावळली आहे. पावसामुळे खाचरांत पाणी व चिखल झाल्याने भात कंपनी यंत्र व हार्व्हेस्टर शेतात शिरणे मुश्किलीचे झाले आहे. शेतात असून बेमोसमी पावसाने झालेले शेतातील नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले असून तोंडचा घास पळवला आहे.