चोरट्यांची दिवाळी, वीस दिवसांत तब्बल २४ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सात्यत्याने वाढ होत असून चोरटयांनी यंदाची दिवाळी चांगलीच साजरी केली आहे. चोरटयांनी वीस दिवसांत तब्बल २४ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शहरात घरफोडीच्या घटनांदमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यातच यंदा दिवाळीला नागरिकांनी चांगलीच साजरी केल्यानंतर चोरट्यानाही दिवाळी चांगलीच जोरात गेल्याचे दिसून आले आहे. नोकरीच्या निमित्ताने नाशकात आलेले तात्पुरते रहिवासी दिवाळी ला गावाकडे जात असतात. अनेकजण आपले आप्तेष्ट आणि नातेवाईकांना भेटायला जातात. हीच संधी साधत चोरट्यांनी एकामागून एक घरफोड्या करत दिवाळी साजरी केली आहे.

त्यात पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ०१ मधील पंचवटी ०१, गंगापूर पोलीस ठाणे हद्दी भागात २, आडगाव १, सरकारवाडा १, मुंबईनाका ०१ आणि परिमंडळ ०२ मधील नाशिकरोड २, उपनगर ४, सातपूर ०२, इंदिरानगर ०१, अंबड पोलीस हद्दी भागात ०१ असे घरफोडीचे २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चोऱ्यांतून तब्बल २४ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी सणाच्या काळात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे.