नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सोळाशे बंदीजणांवर उपचार

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आयोजित सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून सोळाशे बंदीजणांवर उपचार करण्यात आले. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले.

नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृह हे कैद्यांसाठी महत्वपूर्ण मानले जाते. येथील कारागृहातील कर्मचारी बंदीजनांसाठी सतत काही ना काही उपक्रम करीत असतात. आता या ठिकाणी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यात आले. या आरोग्य शिबिरात तुलसी आय हॉस्पिटल, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, केबीएच डेंटल कॉलेज, नामको चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहभाग घेतला.

यावेळी नेत्ररोग, त्वचारोग, दंतरोग, रक्त, लघवी आदींची तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात आले. कारागृहातील बंदीजनांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी धर्मादाय रुग्णालयांमार्फत वैदकीय तपासणी शिबीर घेण्याची विनंती कारागृह प्रशासनाने केली होती.