सुरगाण्यात ‘या’ नगरसेविकेचे एक मत ठरवणार ‘नगराध्यक्ष’ कुणाचा?

सुरगाणा । प्रतिनिधी
सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विजय कानडे तर शिवसेनेकडून भारत वाघमारे या दोघांचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजप ८, शिवसेना ६,माकप २ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १ नगरसेविका आहेत.

मागील पंचवार्षिक निवडणूकीनंतर युती असताना पाच वर्षांच्या कालावधीत पहिली अडीच वर्षे भाजपच्या नगराध्यक्ष रंजना लहरे ह्या होत्या. मात्र राजकीय समीकरणे बदलल्याने दुसरी अडीच वर्षे माकपच्या सोनाली बागुल ह्या नगराध्यक्ष झाल्या होत्या. आता दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर कुणालाही बहुमत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा नगरपंचातीचा तिसरा नगराध्यक्ष कोण विराजमान होणार व हे पद मिळविण्यासाठी कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली आहे.

सुरवातीस भाजपकडून सचिन महाले व विजय कानडे या दोन नावाची चर्चा सुरू होती. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार विजय कानडे यांचा एकमेव अर्ज भाजपकडून दाखल झाला आहे. त्यांना सुचक म्हणून नगरसेविका मालतीबाई खांडवी तर अनुमोदक म्हणून नगरसेविका जानकीबाई देशमुख या आहेत. शिवसेनेकडून भारत वाघमारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सुचक म्हणून नगरसेवक सचिन आहेर तर अनुमोदक नगरसेवक भगवान आहेर आहेत. हे दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी वैध ठरवले आहेत.

यावेळी तहसिलदार सचिन मुळीक हे उपस्थित होते. विजय कानडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समीर चव्हाण यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर भारत वाघमारे यांचा अर्ज दाखल करतेवेळी तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, गटनेता सचिन आहेर, नगरसेवक भगवान आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यात सुरुवातीला सचिन महाले यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने ते उमेदवारी अर्ज भरते वेळी नाराज होऊन निघून गेले असल्याची आतल्या गोटातून चर्चा सुरु होती. सचिन महाले यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल. शेवट पर्यंत पक्षाशी बांधिलकी जपत एकनिष्ठ राहणार आहे. भाजपचे ८ नगरसेवक असून त्यांना १ मताची गरज आहे. आणि हे एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री शेजोळे यांचे राहणार असल्याचे गृहीत धरले आहे. त्यामुळे विजय कानडे यांचीच नगराध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.

शिवसेनेचे ६ नगरसेवक असून माकपच्या २ नगरसेविका त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनाही १ मताची आवश्यकता असून सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री शेजोळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नगरपंचायत नगराध्यक्ष पद खुला प्रवर्ग करीता आरक्षण जाहीर झाले आहे. भाजपकडे अनु. जमातीचे उमेदवार आहेत. मात्र निवडणूक पुर्वीच ठाम निर्णय घेण्यात आला होता की नगराध्यक्ष पदाकरीता जे आरक्षण सोडत होणार त्यांनाच संधी दिली जाणार या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. शहरातील बहुजन समाजाला ग्रामपंचायत ते संसद सदस्यपर्यंत संधी मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांचे आरक्षण आहे, त्यांनाच संधी देऊन समांतर भुमिका घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न मी कसोशीने केला आहे. सर्वच समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी अशा उद्देश या घेतलेल्या निर्णयामागे आहे. – माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण.