नाशिकमधील दोन लाख बालकांना उद्या ‘दो बुंद जिंदगी के”

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरात उद्या दि.२७ फेब्रुवारी २०२२ रविवारी पल्स पोलिओची मोहीम राबविली जाणार आहे. शहरात सुमारे दोन लाख बालकांना या लसीचा लाभ होणार आहे. एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने दक्ष राहावे, अशी सूचना नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री कैलास जाधव यांनी दिले आहे.

या मोहिमेसाठी शहरातील मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी यावेळी सहभागींना मार्गदर्शन केले.मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शहरात १००५ पोलिओ बुथची रचना करण्यात आली आहे. ४४ फिरते पथक शहरातील लाभार्थ्यी पर्यंत पोहचण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

याशिवाय बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथे ७० ट्रान्झिठ टीम कार्यरत असतील. पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ बालकाला पालकांकडून करून दिला नसल्यास अशा घरांचा शोध पथके घेणार आहे.मोहिमेच्या दिवशी बुथवर व त्यानंतर सुटलेल्या लाभार्थ्यांना शहरात ५ दिवस घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश(नाना) कुलकर्णी यांच्या हस्ते नाशिकरोड येथील जे. डी. सी बिटको रुग्णालय येथे या मोहिमेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे.

तरी या मोहिमेत सर्व पालकांनी शुन्य ते पाच वयोगटातील आपल्या बालकांना उद्या दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आठवणीने पोलिओची ची लस द्यावी व शहराचे उद्धिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव,वैद्यकीय विभागाचे डॉ. बापूसाहेब नागरगोजे व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.