आरे कॉलनीत गहू-तांदळाचा अनधिकृत साठा जप्त;

मुंबई । प्रतिनिधी
गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये सहकार भांडार, युनिट क्र. २ मध्ये अनधिकृतपणे साठा केलेला तांदूळ आणि गहू पोलीसांनी जप्त केला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

या भागात असे प्रकार घडत असल्यास पोलीसांची मदत घेऊन चौकशी करण्यात येईल आणि यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जालना, कोल्हापूर तसेच मुंबईतील शिधावाटप केंद्रावर धान्याच्या काळाबाजाराबाबत विधानसभा सदस्य संतोष दानवे, पराग शाह आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अनधिकृतपणे साठा केलेला ३६ हजार ६५० किलो तांदूळ आणि ४५ हजार किलो गहू आणि या गुन्ह्यातील वाहन गोरेगाव सहकार भांडार युनिट क्र. २ येथून पोलीसांनी जप्त केले आहे.

या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जणांना अटक केली आहे. संबंधित वाहन मालकावर कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.