दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीतील अनोखा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

नाशिक | प्रतिनिधी

दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक व माऊली धाम आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रघुनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील स्वामी जनार्दन मठात दृष्टीहीनांच्या ज्ञानेश्वरी पारायणाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला आळंदी देवस्थानचे अध्यक्ष संदीपान महाराज हासेगावकर, शिक्षण अधिकारी कदम, श्री महंत मंहामंडलेश्वर रघुनाथ महाराज व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संदीपान महाराज हासेगावकर यांनी हे आगळेवेगळे दृष्टीहिनांचे ज्ञानेश्वरी पारायण असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. हा क्षण वारकरी संप्रदायात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्या सारखा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी रघुनाथ महाराज म्हणाले की समाजातील उपेक्षित लोकांना व्यासपीठ मिळावे यासाठी ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करीत असल्याचे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर ज्ञानेश्वर पारायण यामागील भूमिका स्पष्ट करताना म्हणाले डोळस व्यक्तींना विविध व्यासपीठावरून विविध पारायणे करण्याची संधी वेळोवेळी निर्माण होते. पारायणमुळे अध्यात्माची गोडी तर लागेलच शिवाय एक नवीन ऊर्जा देखील प्राप्त होईल.

पुढील दोन दिवसात दृष्टिहीन व्यक्तींना ब्रेल ज्ञानेश्वरी सहज आणि सोप्या पद्धतीने आकलन व्हावी म्हणून ह.भ.प पुंडलिक महाराज पिंपळके यांच्या मार्गदर्शनाखाली पारायणाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महेंद्र मोरे, रेचल शिरसाठ यांचे विशेष योगदान मिळाले.