येवल्याच्या आम्रपालीचा आवाज ऐकून अजय-अतुलही चकित !

येवला । पांडुरंग शेळके

एका सर्वसामान्य कुटुंबातील १५ वर्ष वयाची आम्रपाली पगारे हिने गायनाचे शिक्षण नसताना साडेचार हजार स्पर्धकांतून थेट सोनी मराठीच्या इंडियन आयडॉलमध्ये धडक मारली आहे. पहिल्याच कार्यक्रमात तीने आपल्या मधुर गायनातून लक्ष वेधले. संगीतकार अजय-अतुल,गायिका बेला शेंडे यांनी तीचे तोंडभरून कौतुक करत शाबासकी दिली आहे.आज तिला टीव्हीच्या स्क्रीनवर पाहून येवलेकरांचा ऊर भरून आला.

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी आम्रपाली नांदूर या छोट्याशा गावातील गौतम पगारे यांची लेक.. वडिलांचा बेंजोचा व्यवसाय एवढीच पार्श्वभूमी असताना तिने फक्त मोबाईल वरील संगीत व गाणे ऐकून आपल्यातील गायन कलेला बहर दिला.यामुळे वेगवेगळ्या व्यासपीठावर चमकणारी आम्रपाली सोनी मराठीने जेव्हा इंडियन आयडल शो साठी ऑनलाईन प्रवेश फेरी घेतली, तेव्हा तिने सर्वांचे लक्ष वेधले. राज्यातील सुमारे साडेचार हजार गायक स्पर्धकांतून पात्र ठरत या व्यासपीठावर पोहोचली आहे.

कुठलीही पार्श्वभूमी नाही,गायनाचे तंत्रशुद्ध शिक्षणही नाही मात्र तिचा आवाज ऐकला की ऐकणारा ही क्षणभर मंत्रमुग्ध होऊन जातो…इतक्या सुरेल आवाजात गाणाऱ्या आम्रपालीचे गायन ऐकल्यावर पहिल्याच वेळी अजय अतुल देखील अवाक झाले होते. नांदूर या छोट्या गावातून कुठलेही शिक्षण प्रशिक्षण नसताना इतक्या सुरेल आवाजात गाणाऱ्या आम्रपालीच्या गायनावर इंडियन आयडॉल कार्यक्रमाची संपूर्ण टीमच खुश झाली,यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी नांदूर येथील तिच्या घरी तसेच सावरगावच्या शाळेत येऊन तिच्या या सर्वसाधारण परिस्थितीचे चित्रीकरण देखील केले आहे.

दोन दिवसापासून या कार्यक्रमाचा प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून यातही गायिका बेला शेंडे व अजय अतुल आम्रपालीचे कौतुक करताना दिसत असल्याने या आपल्या मायभूमीतील लेकीचे सर्व स्तरातून तोंडभरून कौतुक होत आहेत. किंबहुना शाळेतील शिक्षक विद्यार्थी व नांदूर पंचक्रोशीत देखील या तिच्या यशाचे भरभरून स्वागत झाले आहे. सोमवारी व मंगळवारी रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. माझ्या मुलीवर माझा विश्वास होता आणि तो तिने सार्थ ठरवला आहे. मला संधी मिळू द्या, मी सोनं करील हे ते मी नेहमी म्हणायची. आज इतक्या मोठ्या व्यासपीठावर तिची निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यातला झालेला आनंद अवर्णनीय आहे.यापुढेही तालुकावासियांनी तीला प्रोत्साहन व पाठिंबा द्यावा अशी भूमिका तीचे वडील गौतम पगारे यांनी व्यक्त केली.

सावरगाव विद्यालयात झाला गौरव
आम्रपाली सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने तिला उभारी देत अनेक दानशूरांनी मदतीचा हात देखील दिला. शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेचे सरचिटणीस प्रमोददादा पाटील,सरचिटणीस प्रवीणदादा पाटील यांनीही तिला बक्षीस देऊन गौरवले आहे.पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार यांनीही तिचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या आवारात तिच्या प्रवेशाची वार्ता कळताच प्राचार्य शरद ढोमसे यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन करून तिचे कौतुक केले. यावेळी भर सुट्टीतही विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन तिच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य शरद ढोमसे, सौ.विनता ढोमसे,पर्यवेक्षक व्ही.एन.दराडे,ज्येष्ठ शिक्षक साहेबराव घुगे,पोपटराव भाटे, यशवंत दराडे, नामदेव पवार, गजानन नागरे, योगेश भालेराव, वसंत विंचू,लक्ष्मण माळी,संतोष विंचू,योगेश पवार,कैलाश मोरे,प्रमोद दाणे,ऋषिकेश काटे,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे,सागर मुंढे,रोहित गरुड,चौधरी आदीसह शिक्षक उपस्थित होते.

“आमच्या विद्यालयातील आम्रपालीने घेतलेली गरुड झेप आम्हा सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.अल्पवयातही तिने जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले असून ती तरुणाईसाठी रोल मॉडेल ठरली आहे. या स्पर्धेत ती नक्कीच नावलौकिक मिळवेल.तीच्या या उत्तुंग भरारीचा आम्हाला अभिमान आहे.”
-प्रवीणदादा पाटील, सहचिटणीस,
शिक्षण प्रसारक मंडळ,नगरसुल

“आम्रपालीने तालुक्याचे नाव रोशन केले आहे.आमच्या सावरगाव,नांदूर पंचक्रोशीसाठी ती नक्कीच भूषणावह आहे.जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मिळवलेले यश आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.”
-संभाजीराजे पवार,माजी सभापती, येवला