नाशिक : निफाड तालुक्यातील करंजगाव येथे बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली आहे. येथील क्रूर बिबट्या चालू दुचाकीवाहानांवर देखील हल्ला करून माणसांना गंभीर जखमी करत आहे. काल अश्याच प्रकारच्या दोन घटना १ तासात घडल्या असून संध्याकाळच्या वेळी दुचाकीस्वार करंजगाव-सायखेडा रस्त्यावर जात असताना त्याच्यावर बिबट्याने झडप घालत आपला घास करण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक कसाबसा वाचला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या मनात चांगलीच दहशत बसली असून यावर कडक उपाययोजांची मागणी गावकऱ्यांकडून केली जातेय.

नाशकात अनेक दिवसांपासून बिबट्याचे माणसांवरील हल्ले वाढत चालले असून यात अनेक माणसांना गंभीर दुखापत झाली आहे. बिबट्या फक्त मानवांवरच हल्ले न करता कुत्र्यांना देखील आपले शिकार बनवत आहेत. तसेच नाशिक शहरात देखील बिबट्याचा मुक्तसंचार अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. एकूणच बिबट्या नाशकात आपली दहशत पसरवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निफाड तालुक्यातील सायखेडा गावाशेजारी असलेले करंजगाव या गावात जास्त करून उसाची शेती होते. आणि लपण्यासाठी बिबट्याला उसाचे शेत जास्त सुरक्षित वाटते. त्यामुळे इथे त्यांचे प्रमाण अधिक आहे. गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार काही आश्चर्य नाही. मात्र काल एका तासाच्या आत एकाच बिबट्याने २ व्यक्तींवर झडप घालून हल्ले केल्याने गावात तसेच परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून या भागात अनेक जणांवर बिबट्याने हल्ले केले असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
धनंजय राजेंद्र वाघ हे करंजगाव या गावातील रहिवासी असून ते रात्रीच्या वेळी करंजगाव- सायखेडा रस्त्यावरून दुचाकीवर जात होते. अचानक एका उसाच्या शेतातून बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना गंभीर जखमी केले. आणि पुन्हा उसाच्या शेतात बिबट्या पळून गेला, बिबट्याने दुचाकी सुरु असताना देखील हल्ला केल्याने सगळे आश्चर्य व्यक्त करत असून अनेकांच्या मनात आता बिबट्याची जबर भीती बसलीय. धनंजय वाघ यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बिबट्या झाडावर घालत होते पिंगा
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या सांगवी येथील दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावरती चढताना दोन बिबटे आढळून आले होते. यामध्ये पहिल्यांदा एक नंतर एक बिबट्या असे दोन बिबटे नारळाच्या झाडावर येजा करीत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आता हे बिबट्या नवनवीन कला शिकत असून नारळाच्या झाडावर चढणे काय आणि चालू दुचाकीवर झडप घालणे काय या कला बिबट्या अवगत करत असून नागरिकांना आपला घास करत आहे. त्यामुळे या भागात दहशत पसरली असून पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.